धाकट्या छत्रपतींच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण ! छत्रपती संभाजी महाराजांची किल्ले पुरंदर ते वढू पायी पालखी सोहळ्याचे आयोजन ….!

उरुळीकांचन : स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक पर्यंतचा पालखी सोहळा बुधवार (ता. २६) ते शनिवार (ता. २९) दरम्यान होणार आहे.
या वर्षी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबतची बैठक नुकतीच भिवडी (ता. पुरंदर) येथे झाली. यावेळी पै. सचिन पलांडे, भाऊसाहेब शिंदे, प्रशांत वांढेकर, ज्ञानेश्वर शिवले,सदानंद बोरकर, योगेश तावडे, अमित पवार, विश्वास जगताप, राजेश कंद,संकेत जाधवराव, संकेत दरेकर, ऋषिकेश धुमाळ, रवी मुंडे, शिवतेज काळे आदी उपस्थित होते
या पालखी सोहळ्याचे हे ११ वे वर्ष असून यावर्षी राज्यातून असंख्य युवक सहभागी होणार असून, त्यात चांदीचा रथ, अश्व, स्वराज्यातील सरदार घराणे, भजनी मंडळांचा देखील समावेश आहे. ‘संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे युवकांपुढे नव्याने स्मरण करणे खरी प्रतिमा जगासमोर आणणे, त्यांच्या शौर्याची आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाची नव्या पिढीला ओळख व्हावी या हेतूने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान पेरणे येथील किरण कोलते यांना देण्यात आला असून, अश्वाचा मान हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विलासराव मोहिते यांना देण्यात आल्याची माहिती सचिन पलांडे यांनी दिली.
त्यानुसार पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता.२६) सकाळी ८.३० वाजता किल्ले पुरंदर येथे अभिषेक व आरती करून पालखीचे पुरंदर- हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले-पुरंदर येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर श्री क्षेत्र नारायणपूर येथे विसावा व त्यानंतर काळेवाडी येथे मुक्काम करून बुधवार (दि. २६) पासुन सोबत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पायी पालखी सोहळा संपन्न होणार आहे.