पुणे महानगरच्या सर्वांगीण विकासासाठी G-Hub प्रकल्पाची तयारी सुरू, PMRDA कडून निधीची तरतूद….

पुणे : पुणे महानगर प्रदेश (PMR) तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असून, या प्रगतीशील पायाभूत सुविधांमुळे पुण्याला ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर यशदा (YASHADA) पुणे महानगर प्रदेशासाठी आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार असून, या उपक्रमासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) निधीची तरतूद करणार आहे.
या प्रस्तावासंदर्भात नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. केंद्र सरकारनं २०२४ च्या अर्थसंकल्पात देशभरात १४ ‘ग्रोथ हब’ शहरांच्या विकासाची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश, सुरत, वायझॅग आणि वाराणसी येथे ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
यामध्ये आता पुणे, नागपूर आणि नाशिक यांचा समावेश करण्यात आला असून, पुणे महानगर प्रदेशासाठी G-Hub प्रकल्पाची तयारी सुरू झाली आहे. पुणे हा आयटी कंपन्या, मेट्रो, औद्योगिक कॉरिडोर्स, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक आणि आरोग्य सेवांच्या सुविधांमुळे ‘ग्रोथ हब’ बनण्याच्या दिशेने आघाडीवर आहे. यशदा संस्थेमार्फत तयार होणाऱ्या विकास आराखड्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त करणार आहेत.
तर या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिका, पीएमआरडीए आणि अन्य यंत्रणांमार्फत केली जाईल. सध्याचे पुण्याचे सकल उत्पन्न ₹४.२ लाख कोटी असून, २०३० पर्यंत येथे १५ ते १८ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यामध्ये किमान ६ लाख महिला कामगार असतील, असा अंदाज आहे. त्यामुळं देशातील आर्थिक विकास आराखडा स्वीकारणारं पुणे हे पहिलं शहर ठरणार आहे.
पुण्याच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन यांसारखे क्षेत्र तसंच चाकण, तळेगाव, रांजणगाव एमआयडीसीमधील ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, प्रिसीजन इंजिनीयरिंग आणि फार्मा क्लस्टरसारखी औद्योगिक ताकद मोठी भूमिका बजावणार आहे. शहरात ८०० हून अधिक उच्च शिक्षण संस्था असल्याने पुणे एक स्किलिंग-एक्सपोर्ट केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
मेट्रो, रिंग रोड, नवीन टाउनशिप आणि स्मार्ट नागरीकरणाच्या संधी तसंच वारसा, कृषी व आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. व्यवसाय सुलभतेतील सुधारणा, स्टार्टअप व परदेशी गुंतवणुकीस पोषक धोरणांमुळे पुणे ‘ग्लोबल ग्रोथ हब’ म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास आहे, असेही अजित पवार म्हणाले.