Pradeep Kand : शिरुर – हवेलीत पक्षश्रेष्ठींचा प्रदिप कंद यांनाच आर्शिवाद! भाजपच्या पारड्यात मतदारसंघ जाणार असल्याचे जवळपास निश्चित..!!

जयदिप जाधव
Pradeep Kand उरुळीकांचन : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिरुर -हवेली हा मतदारसंघ महायुतीकडून जागा वाटपात भाजपच्या वाटेला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पक्षश्रेष्ठींनी तसा ‘तयारी’चा शब्द दिला असल्याने हा मतदारसंघ भाजपकडून प्रदिप कंद यांच्यासाठी सोडला जाणार असल्याचे संकेत मिळू लागल्याने महायुतीकडून हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार म्हणून सुरू असलेल्या शक्यतांना लवकरच पूर्णविराम मिळणार आहे.
राज्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाल्याने लोकसभेप्रमाणे राज्यातील जागा वाटपातील प्राथमिक बोलणी सुरू झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार विधानसभेच्या जागावाटपा संदर्भात मतदारसंघाचा दावा महायुतीत सुरू झाला आहे. त्यानुसार सध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागा त्या पक्षाला सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे स्टँडींग आमदारांच्या जागा कायम राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
त्यानुसार शिरुर लोकसभा मतदारसंघातील ६ जागांपैकी ५ विधानसभेच्या जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा कायम असला तरी भाजपने शिरुरच्या या मतदारसंघावर हक्क सांगितला असल्याची माहिती पुढे येत आहे. महायुतीत २०१९ च्या सूत्रानुसार जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. त्यानुसार महायुतीच्या घटक पक्षांनी जागा मागणी सुरु केली आहे.
त्यानुसार इच्छुकांना व विधानसभा निवडणूक प्रमुख यांना तयारीच्या पूर्व सूचना सुरू झाल्या आहेत.जागावाटपात तिढा नसलेल्या जागांवर महायुतीकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अशातच २०१९ मध्ये राष्ट्रवादी ने जिंकलेली शिरूर-हवेली विधानसभेची जागा प्राधान्यक्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणार असल्याची शक्यता असताना भाजपकडून या जागेबाबत पक्षश्रेष्ठींनी सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार प्रदिप कंद यांना जागा सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. Pradeep Kand
शिरुर लोकसभेच्या ६ विधानसभा पैकी ४ जागांवर अजित पवार यांच्या गटाचे आमदार असल्याने शिरुर व भोसरीची जागा भाजपच्या पडावी म्हणून भाजपकडून व्यूव्हरचना सुरू आहे. त्यातच गत लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना या ठिकाणी उमेदवार आयात करावा लागला होता. व या मतदारसंघात राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला आहे. तशीच काही परिस्थिती शिरुर-हवेलीच्या विधानसभेच्या जागेबाबत असून जागावाटपापूर्वीच भाजपच्या श्रेष्ठींना पदाधिकाऱ्यांनी जागृत केले असून तयारीच्या सूचना दिल्या असल्याचे पदाधिकारी खाजगीत सांगत आहेत. त्यानुसार या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून प्रदिप कंद यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
हवेलीला प्रथमच मिळणार संधी…!!
शिरुर – हवेली मतदारसंघात विधानसभेची ही शेवटची निवडणूक ठरणार आहे. त्यानंतर मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. शिरुर -हवेलीत गत तीन निवडणूकांत हवेलीला शिरूरच्या नेतृत्वावर विसंबून रहावे लागले आहे. यंदा मात्र निवडणूक ही पूर्णपणे वेगळी ठरणार आहे. हवेलीतून मतदारही शिरुर पेक्षा ४५ ते ५० हजारांनी वाढणार आहे. व महायुतीची उमेदवारी तालुक्यात असणार आहे. तसेच प्रदिप कंद यांचा यापूर्वीचा जिल्हा परिषदेत विक्रमी मतांनी विजय ,जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीला चारलेली धूळ या धक्कांनी कंद हे तगडे आव्हान देणार हे निश्चित आहे.