Pradeep Kand : शिरुर-हवेली विधानसभा जागेवरुन भाजपचे टेन्शन वाढले! प्रदिप कंद जागा राखण्यासाठी कोणती व्यूहरचना करणार?

जयदिप जाधव

Pradeep Kand उरुळीकांचन : लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला अपयश आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला शिरुर -हवेली मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार म्हणून भाजपच्या पदाधिकारी वकार्यकर्त्यांना चिंता सतावू लागली असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीची युती झाल्यास राष्ट्रवादीकडे सोडला जावू नये असा कार्यकर्त्यांचा मतप्रवाह सुरू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसल्याने राज्यातील सर्व मतदारसंघात पराभवाची कारणे शोधण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अजित पवार गटाला एकसंध राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी च्या अजित पवार गटाला पुणे जिल्ह्यातील विद्यमान आमदारांसह राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेल्या ठिकाणी जागा सोडाव्या लागणार आहे. त्यानुसार शिरुर विधानसभा मतदारसंघातील जागेवरही अजित पवार गटाकडून मागणी होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे शिरुरची जागा राष्ट्रवादीला जाऊ नये म्हणून निष्ठावान कार्यकर्तेच आता सावध झाले आहे. त्याबरोबर ही जागा भाजपकडे टिकविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी प्रयत्न करावे असे साकडे भाजप कार्यकर्ते घालू लागले आहेत.

२००९ मध्ये शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी भाजपचे जिल्ह्यातील ग्रामीणभागात कसलेच अस्तित्व नव्हते. अशापरिस्थित २००४ साली दिवंगत नेते बाबुराव पाचर्णे यांनी या मतदारसंघात भाजपचा झेंडा रोवला होता. या मतदारसंघात २०१४ च्या विधानसभेत त्यांनी विजयी मिळविला आहे. या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शहरीकरण व मोठी गावे असल्याने या मतदारसंघात भाजपची वोट बँक मोठी आहे. तसेच या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक पातळीवर भरीव काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या ठिकाणी सामाजिक वाटचालीत सक्रिय कार्यशील आहेत. त्यामुळे संघटन पातळीवर भाजप या ठिकाणी वरचड असल्याचा भाजपचा दावा आहे.
प्रदिप कंद यांची भूमिका महत्त्वाची!!
शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कडून अजित पवार यांच्याकडून सर्वप्रथम जिल्हा बँकचे संचालक प्रदिप कंद यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखविला होता.मात्र तडजोडीच्या भूमिकेत शिवाजी आढळराव पाटील यांना अजित पवार यांना उमेदवारी द्यावी लागली होती. विधानसभेला राष्ट्रवादी जागा सुटल्यास तोच प्रयोग करण्याची अजित पवार गटावर येणार आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये असलेल्या प्रदिप कंद यांना मतदारसंघ भाजपकडेच राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शेजारील दौंडची जागा भाजपकडे राहणार असल्याचे निश्चित असल्याने शिरुरची जागा भाजपकडे राहण्याचे अधिक फायदेशीर असल्याचे कार्यक्रम बोलत आहे.