राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे आज शक्तिप्रदर्शन! आमदार कोणाचे आज होणार फैसला!!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत सर्वांना मोठा धक्का दिला. त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितला आहे.
त्यासाठी दोन्ही गटांनी आज आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांच्या बैठका मुंबईत बोलावल्या आहेत. त्यामुळे आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांच्या पाठीशी किती आमदार आहेत, हे उद्या स्पष्ट होणार असून, दोन्ही बाजूंनी व्हीप काढण्यात आला आहे. मात्र, यामुळे आमदार, पदाधिकारी पेचात सापडले आहेत.
तसेच अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलावली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला तर शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दोन व्हीप जारी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मात्र सत्वपरीक्षा सुरू झाली आहे. शरद पवार की अजितदादा पवार, कुणाच्या पाठिशी उभे राहायचे, हा अनेकांना पेच पडला आहे.
आज सकाळी ११ वाजता अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे पक्षाची बैठक बोलावली आहे तर दुपारी शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते कोणत्या बैठकीला हजर राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप जारी केला. उद्या पक्षाची बैठक आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचा व्हिप जारी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे पत्रात म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेच्या आमदारांसाठी शशिकांत शिंदे यांनी व्हिप जारी केला. विधान परिषदेच्या एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत ५ तर शरद पवारांसोबत ४ आमदार आहेत.
रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे, सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत तर एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबाजानी दुरानी हे शरद पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत.
अजित पवार यांच्या बंडाचा आज निर्णय…
अजित पवार यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देऊन भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. किती आमदार आपल्या पाठीशी आहेत हे सांगण्याचे त्यांनी आतापर्यंत टाळले असले तरी दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शपथविधीला हजर असलेल्या काही आमदारांनी नंतर भूमिका बदलल्याने अनिश्चितता आहे. अशा स्थितीत उद्या अजित पवारांच्या बंडाचा फैसला होणार आहे.
अजित पवार यांच्याकडे ४१ पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा आहे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शपथ घेतलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा दावा केला आहे.
सुप्रिया सुळेंनेही केले आवाहन
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केले आहे आणि साहेबांचादेखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नाते अतूट आणि पहाडासारखे भक्कम आहे.
प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवारसाहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.