इच्छुकांच्या तयारीवर पुन्हा पाणी!! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, कोर्टाने दिली पुढची तारीख….


मुंबई : जवळपास गेल्या ४ वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात आज २३ व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

पण, आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर पुढील सुनावणी आता २५ फेब्रुवारी होणार आहे. यामुळे आता आणखी एक महिना पुढे निवडणुका ढकलण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय पक्षांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत.

तर दुसरीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान, कोर्टाने कुठेही निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही. मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय घेण्याची विनंती केली होती.

तर दुसरीकडे काहींनी न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी धाव घेतली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!