पूजा खेडकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता, घरी पोलीस झाले दाखल, नेमकं घडतंय काय?

मुंबई : वादग्रस्त माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरी पुणे पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. मात्र पूजा खेडकर अद्यापही पोलिसांना सापडू शकलेल्या नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे पुणे पोलीस कालपासून पूजा खेडकर यांच्या मागावर आहेत. पण अद्यापही पूजा यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पूजा खेडकर यांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
पोलीस पूजा खेडकर यांना शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथक रवाना करु शकतात. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार असल्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता. पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
पण दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर यांना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करु शकतात, याची शक्यता वाढली होती. विशेष म्हणजे आता पोलिसांचं पथकच पूजा यांच्या बाणेर येथील घरी पोहोचलं आहे. पण पूजा खेडकर या त्यांच्या बाणेर येथील घरी सापडतील का? हे सांगणे कठीण आहे.