Pooja Khedkar : पूजा खेडकरचे पाय अजून खोलात, वडील कोट्याधीश, स्वतःकडे करोडोंची संपत्ती, राजकारणाशीही संबंध…
Pooja Khedkar : पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर अचानक चर्चेत आल्या. बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. तसेच मुलीप्रमाणेच दिलीप खेडकर यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत.
त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या.
आता पूजा खेडकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. Pooja Khedkar
त्यांनी सांगितले की, पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा लढवली होती. त्यांची एकूण संपत्ती ४० कोटी इतकी आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे.पूजा खेडकर यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली आहे.
तसेच, त्यांनी ओबीसी नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते.नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचा पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे.
दिलीप खेडकर हे अधिकारी असताना त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांचे निलंबनही झाले होते. त्यांचे मुळ गाव पाथर्डीमधील भालगाव आहे. अभियांत्रिकीचे त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन मुले आहेत.
पूजा खेडकर या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी आहेत, तर पियुष हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांना १३ हजार ७४९ मते मिळाली होती.
दरम्यान, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष होते. माहितीनुसार, त्यांनी पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी मोहटादेवीला साकडे घातले होते. दीड किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण करणार असल्याचे ते म्हणाले होते.