Politics News : राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार; ५ सप्टेंबरला महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन…
Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते ५ सप्टेंबर रोजी कडेगावरमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिली. दरम्यान यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असे बोलले जात आहे.
स्व. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या सोनसळ येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. Politics News
या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आदी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर कडेगावमधील बयाबाई कदम महाविद्यालयाच्या पटांगणात महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सुमारे दोन ते अडीच लाख लोक उपस्थित राहतील, असे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.