Politics News : भाजपाच्या माजी नेत्याची मोठी खेळी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे दिले संकेत…
Politics News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत हुकल्यानंतर भाजपासमोरील समस्या सातत्याने वाढत आहेत. त्यातच काही महिन्यांवर आलेल्या झारखंडमधीस विधानसभा निवडणुकीमुळे या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एकीकडे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राज्यातील समिकरणं बदलली आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या एका बड्या माजी नेत्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपाचं टेन्शन वाढले आहे.
यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन करण्याचा निर्णय हा हजारीबार येथे झालेल्या अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हजारीबाग येथे अटल विचार मंचची बैठक नुकतीच झाली. प्राध्यापक सुरेंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय सांभाळणारे यशवंत सिन्हा हे ही उपस्थित होते.
तसेच अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा प्रस्ताव संमत करण्यात आला. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या पक्षाचे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावावर असेल. Politics News
दरम्यान, यशवंत सिन्हा म्हणाले की, आजचे राजकारण हे चाटुकारितेचे राजकारण बनले आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर वाटचाल करून स्वच्छ चारित्र्याचं राजकारण करून समाजातील प्रत्येक वर्गाचा उत्कर्ष करता येऊ शकतो. त्यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता आहे. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना कधी होणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.