Politics News : महायुतीचा प्रचाराचा नारळ फुटला!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना चकवा…


Politics News : सध्या राजकारणात अनेक घडा मोडी घडताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही अनेक पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच चोवीस बाय सात निवडणुकीच्या तयारीत राहणे, प्रचारात आघाडीवर राहणे, आपल्या प्रचाराचे नॅरेटिव्ह वा अजेंडा सेट करून त्यावर चोहोबाजूंनी प्रचंड चर्चा घडवून आणून विरोधकांना आपल्या अजेंड्यावर खेळण्यास भाग पाडणे अशा बाबींमध्ये विद्यमान सत्ताधारी असणाऱ्या भाजपचा हातखंडाच आहे! मागच्या दहा वर्षांतील विविध निवडणुकांमध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांना व मतदारांनाही त्याचा विपुल अनुभव आलेला आहेच.

त्यामुळे यावेळीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही भाजपची हीच रणनीती असणार याचा सर्वांनाच अंदाज आहे. या अंदाजानुसार येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांची राममंदिरात प्रतिष्ठापना झाली की, देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी आपल्या पक्षाच्या उद्दिष्टपूर्तीचे मुहूर्त साधून लोकसभा निवडणुकीच्या आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढविणार हाच सर्वांचा होरा होता व त्याचा सामना करण्याची तयारीही विरोधी पक्षांनी केली होती.

मात्र, विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी अतिशय चाणाक्षपणे विरोधकांना बेसावध गाठून अयोध्येतील राममंदिराऐवजी नाशकातील काळाराम मंदिरातून भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवत पुन्हा एकदा सगळ्यांनाच चकवा दिला आहे. Politics News

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्ता प्राप्त करण्याचा व या संदर्भातील अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना खरी असल्याचा निकाल देऊन उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिल्याच्या पार्श्वभूमीवर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या मोदींनी दक्षिण काशी मानल्या जाणा-या नाशकातून प्रचाराचा नारळ वाढवत सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे.

त्यासाठी त्यांनी एकीकडे हिंदुत्वाचा शिगोशीग परिवेष तर दुसरीकडे जनसामान्यांच्या हिताच्या योजनांची बरसात असा दुहेरी अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेसाठीच्या प्रचारात हा दुहेरी अजेंडा सफाईदारपणे कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिकच मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांना दिवसभराच्या दौ-यात दिले.

अयोध्येतील राममंदिर उद्घाटनावर बहिष्काराचे अस्त्र उगारून भाजपच्या अजेंड्याला उत्तर देण्याची तयारी करत असलेले विरोधी पक्ष मोदींनी महाराष्ट्रातून सेट केलेल्या या दुहेरी अजेंड्याचा सामना कसा करणार याची आता उत्सुकता असेल. तसेही मोदी सत्तेवर आल्यापासून विकासकामांच्या उद्घाटनाला ‘इव्हेंट’चे रूप देऊन जनतेवर गारूड कसे निर्माण करायचे याचा एक नवा फॉर्म्युला त्यांनी सेट केला आहे.

त्यानुसार एकाच वेळी अनेक योजनांचे उद्घाटन, भूमिपूजन, शिलान्यास, लोकार्पण आदी बाबी एकत्र करायच्या व अशा सगळ्या एकत्र कामांची बेरीज करून येणारा हजारो कोटी बजेटचा आकडा जनतेसमोर मांडून देशाच्या गतिमान व भव्यदिव्य विकासाचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत उतरवायचे हा तो फॉर्म्युला…

महाराष्ट्र दौऱ्यात मोदींनी हाच फॉर्म्युला वापरून विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन, परिचालन करून ‘सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी’ अशी आरोळी ठोकली! प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्ला चढवताना ‘आता देशात मेगा स्कॅमची नव्हे तर मेगा प्रोजेक्टची चर्चा होतेय,’ असा चिमटा काढला आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!