पुण्यात राजकीय वारं फिरणार ; रुपाली ठोंबरे- पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. आता त्यांनी पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्ष बदलाचे संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे रूपाली पाटील आता पक्ष सोडणार असल्याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

रूपाली पाटील यांनी याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या फेसबुकवर केलेल्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले होते. त्यामुळे त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कोणत्याही एका गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रूपाली ठोंबरे पाटील यांनी महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला होता,चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्या संघर्षानंतर ठोंबरेंना पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थ असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षाच्या सद्यस्थितीवर बोलताना त्यांनी काही महिलांना अनुभव नसताना केवळ नेत्यांच्या मागे फिरल्याने पद मिळत असल्याचा आरोप देखील रूपाली पाटील यांनी केला आहे. पक्षातील या परिस्थितीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची खच्चीकरण होत असल्याचा त्यांचं म्हणणं आहे. तसेच पक्षाकडून काही गोष्टींची दखल घेतली जात नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
त्यामुळं आता रूपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी पक्षाला त्या रामराम करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता त्या नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.
