मुंबईत राजकीय खेळी! शरद पवार गटाचा कणखर आवाज सत्ताधाऱ्यांच्यात सामील होणार; कोण आहेत अजित रावराणे?

मुंबई : बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडलं आहे. शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे बळ आणखीन वाढणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मालाड मधील प्रभाग क्रमांक 43 मधून निवडून आलेले अजित रावराणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीत त्यांची विविध मुर्त्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर रावराणे यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही काळापासून प्रभागातील विकास कामांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यात अडचण येत होती. मात्र सत्ताधाऱ्यांशिवाय विकास शक्य नाही. महायुती सरकारकडून सहकार्य मिळवण्याचे आश्वासन त्यांना मिळाल आहे. त्यामुळे मी पाठिंबा जाहीर केला अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीची ही सर्व शक्ती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याची चर्चा होत आहे. आगामी महापौर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोट्या गटाच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.