पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय धमाका, महापौरपदाची सोडत जाहीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडं लागलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या सोडतीला प्रारंभ होणार आहे.

ही सोडत आज जाहीर झाली असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक शहरांमध्ये भाजपाकडे सत्ता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
आरक्षण सोडतीनुसार पुणे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपदही सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची चढाओढ वाढण्याची शक्यता आहे.

या सोडतीनुसार अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच सोलापूर, सांगली, नाशिक, धुळे आणि मालेगाव महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
दरम्यान, राज्यातील २९ महापौरपदांसाठी आरक्षणाचे वर्गीकरण असे आहे. अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जातीसाठी ३, ओबीसीसाठी ८ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १७ महापालिका. यामुळे अनेक शहरांतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरक्षण सोडतीदरम्यान काही ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आले असून परभणी आणि मुंबई महापालिकेच्या आरक्षण प्रक्रियेवर विरोधकांनी हरकती घेतल्या आहेत.
