पुण्यात राजकीय भूकंप; ठाकरेंचे सर्वच नगरसेवक शिंदेंच्या गळाला, शिवसेना शून्यावर

पुणे : महापालिका निवडणुकाआधीच ठाकरेंची शिवसेना शून्यावर आली आहे.महायुतीने शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वच नगरसेवकांना गळाला लावलं आहे. एक- एक करत शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असुन माहितीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा एकही नगरसेवक पुण्यात राहिलेला नाही.महापालिका निवडणुकीपूर्वी हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना शेवटच्या दोन माजी नगरसेवकांनी देखील ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता २०१७ मध्ये निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाना भानगिरे वगळता सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र आता एकही नगरसेवक शिल्लक नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेलाच शहरातील अस्तित्व टिकून ठेवावे लागणार आहे.
शिवसेना सोडून अन्य पक्षात गेलेले माजी नगरसेवक-

भाजप –
बाळा ओसवला, विशाल धनवडे, प्राची अल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, संजय भोसेल, पृथ्वीराज सुतार
शिवसेना शिंदे गट –
नाना भानगिरे
काँग्रेस –
अविनाश साळवे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार –
श्वेता चव्हाण
२०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, आता गेल्या तीन वर्षांत एक-एक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.