मुंबईत राजकीय भूकंप ; शिंदे गटाच्या बड्या नेत्यासह २० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, एकनाथ शिंदेंना मोठा धक्का


मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. या बड्या नेत्यासह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सानपाडामधून बायकोला उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यराव हे प्रयत्न करत होते. पण पक्षाकडून त्यांच्या बायकोला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे ते नाराज झाले.या नाराजीतून त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीदरम्यान हा शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून सोमनाथ वास्कर कुटुंबातील ३ जणांना उमेदवारी दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची तीव्र नाराजी सूर्यराव यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांच्या निष्ठावान कार्यानंतरही बायकोची उमेदवारी नाकारल्याने आपण हा राजीनामा देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मिलिंद सूर्यराव यांनी पुढील दोन दिवसांत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान मिलींद सूर्यराव यांच्यासह २० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेची साथ सोडली. त्यामुळे सानपाडा शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले असून सूर्यराव यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!