पक्ष फोडाफोडीनंतर पुण्यात रंगणार राजकीय संमेलन! सत्ताधारी विरोधी बडे नेते एकाच मंचावर येणार…
पुणे : पुण्यात आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील चार नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे पुण्यात नक्की चाललंय काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्यानंतर सत्तासमीकरणे बदलत आहेत.
तसेच अजित पवार सत्तेत सहभागी होण्याच्या एक दिवस आधीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या पार्श्वभूमीवर आता हे तीनही नेते एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
विशेष म्हणजे या मंचावर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा असण्याची शक्यता आहे.अजित पवार सत्तेत सहभागी होण्याआधी तीन ते चार दिवसआधीच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जलसिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा आणि इतर घोटाळ्यांचा आरोप करुन निशाणा साधला होता.
शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला तेव्हा उत्तर दिले होते. पण मोदींच्या टीकेनंतर लगेच तीन-चार दिवसांनी राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता हे चारही नेते एकाच मंचावर दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी दीपक टिळक यांच्या हस्ते त्यांना टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या वेळी मेट्रो ते रामवाडी या मार्गावरील गरवारे ते रुबी हॉल या टप्प्याचे लोकार्पण देखील मोदी यांचा हस्ते होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असली तरी अद्याप पीएमओकडून अधिकृत दौरा कळवण्यात आलेला नाही.