धक्कादायक! शिरुर पोलिस ठाण्यातील पोलिसावर शस्त्राने वार ; दोघे आरोपी पसार…!
शिरूर : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिसच असुरक्षित असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. यातच आता शिरूर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित घटना जोशीवाडी, गवळी वीटभट्टी जवळील रोडवर शिरूर (ता.शिरूर) या ठिकाणी मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या सुमरास ही घटना घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे यांच्यावर हल्ला करून दोघे जण फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर पोलिस स्टेशनमधील चालक पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे सदर ठिकाणावरून चालत जात असताना, त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल ढकलत रोडने चालले होते. नागरे यांना विचारले की पेट्रोल पंप कुठे आहे? पेट्रोल टाकायचे आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिरूर गावामध्ये व हायवेवर पण पेट्रोल पंप आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना विचारले की, तुम्ही मोटर सायकल ढकलत का चालले आहात. त्यावेळी त्यांनी तुम्ही कोण आहात? असे विचारले असता, त्यांना पोलीस आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी पोलिसावर कोयत्या सारख्या धारदार हत्याराने वार करून पळून गेले. या घटनेत नागरे गंभीर जखमी झाले आहेत.
सदर जखमी पोलिसावर शिरूर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानेवर पाठीमागील बाजूस वार झालेने खोलवर जखम झालेली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात औषध उपचार चालू आहे. शिरूर पोलीस स्टेशन मधील तपास पथकांमार्फत पळून गेलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.