मध्यरात्री पुण्यातील बुधवार पेठेत मोठा राडा! पोलिसांनी केली मोठी कारवाई, ग्राहकांना रस्त्यावर बसवलं अन्…

पुणे : बुधवार पेठ परिसरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री पोलिसांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत झाडाझडती व कडेकोट नाकाबंदी करत पोलिसांकडून बुधवार पेठेतील ५० हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली.

बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली असून अमली पदार्थ, अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने करवून घेतला जाणारा वेश्याव्यवसाय आणि बेकायदा वास्तव्य यावर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे. या कोम्बिंग ऑपरेशनवेळी बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला नुकतंच निलंबित करण्यात आलं होतं.

संबंधित आरोपी तरुणीच्या प्रकरणातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न देणे आणि यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यावर होता. या प्रकरणानंतर चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बुधवार पेठेत आज मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला.
या कोम्बिंग ऑपरेशननुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा फौजफाटा रात्री १२ वाजता बुधवार पेठेत दाखल झाला. बुधवार पेठ परिसरात ये-जा करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती.
शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी महिलांची चौकशी केली आणि या परिसरात आलेल्या ग्राहकांना ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवलं.
दरम्यान, बुधवार पेठेत मध्यरात्री झालेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे शहरात खळबळ उडाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.