‘उरुळी कांचन’ शहरात नको ग्रामीणला हवे ! भाजपकडून अंकित गोयल यांना निवेदन…!
उरुळी कांचन : लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन सह परिसरातील १० गावांसाठी दिड वर्षापूर्वी स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र पोलिस संख्याबळाअभावी स्वतंत्र पोलिस ठाणे अद्याप सुरू न झाल्याने हे पोलिस ठाणे संख्याबळाची उपलब्धता होऊन तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व युवा नेते अजिंक्य कांचन यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे केली आहे.
लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन सह १० गावे विसर्जित करुन उरुळी कांचन पोलिस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे. परंतु भरतीच्या सबबेखाली पोलिस ठाण्याचा कार्यारंभ दिड वर्षे उलटून होऊ शकला नाही. स्वतंत्र पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरू होण्यास दिरंगाई झाल्याने भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व युवा नेते अजिंक्य कांचन यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची सोमवारी (दि. २७) भेट घेऊन निवेदन दिले आहे . यावेळी अंकित गोयल यांनी , राज्य शासनाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी शासन निर्णय झाला आहे.आमचीही स्वतंत्र पोलिस ठाण्याबाबत जागेची कार्यवाही सुरू आहे.आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र ग्रामीण पोलिस दलात अपेक्षित संख्याबळ नसल्याने या पोलिस ठाण्याला संख्याबळ देऊ करण्यास अडचणी येत आहे. तरीही राज्यात पोलिसांची जंबो भरती झाल्यानंतर तातडीने आवश्यक त्या संख्याबळानुसार ग्रामीण पोलिस ठाणे सुरू करण्याची कार्यवाही करु असे त्यांनी अश्वासित केले आहे.
युवा नेते अजिंक्य कांचन म्हणाले,लोणीकाळभोर पोलिस ठाण्याची हद्द शहर पोलिस ठाण्याला वर्ग होऊनही नागरीकांना अपेक्षित परिणाम दिसला नाही. गुन्हेगारी अंकुश , वाहतुक कोंडी , भयमुक्त वातावरण हे बदल शहरात दिसले नाही. ग्रामीण भागात पोलिस ठाण्याचे रुपांतर झाल्यास या भागात आवश्यक मनुष्यबळ होऊन कायदा सुव्यवस्थेचे नियंत्रण ठेवता येणार आहे.लोकसंख्या पर्याप्त बळ मिळाल्यास सुरू असलेल्या चोरींच्या घटना, गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात येतील लोकसंख्ये अभावी स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज असल्याने ही कार्यवाही ताबडतोब करावी अशी मागणी अंकित गोयल यांना भेटून केली असल्याचे अजिंक्य कांचन यांनी सांगितले.