कुंजीरवाडीत मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड! उरुळी, शिंदवणे, थेऊर येथील तिघांना अटक..

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी मोठी पळापळ झाली. या छाप्यात पोलिसांनी तीन जणांना अटक करून सुमारे 7 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यामुळे अशा गैरकृत्याला आता आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलीस अंमलदार संदीप धुमाळ यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाराफाटा चौकाजवळ शिवतेज मोटार गॅरेजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत खुलेआम मटका जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
या कारवाई पोलिसांनी सरफराज शहानुर मणीयार (वय 27, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे), शब्बीर मन्सुर पठाण (वय 41, रा. थेऊर ता. हवेली जि. पुणे), कुणाल संजय महाडीक (वय 24, रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

तेव्हा वरील तीन आरोपी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असताना दिसून आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाणे, पोलीस हवालदार रवी आहेर, पोलीस हवालदार संदीप जोगदंड, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.
याबाबत आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमन कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे साहित्य असा 7 हजार 600 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार योगेश कुंभार करत आहे.