पुण्यात एका फ्लॅटवर पोलिसांचा अचानक छापा, ते कांड पाहून चक्रावले, घटनेने उडाली खळबळ…

पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा असलेल्या सणसवाडी परिसरात सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणात एका तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत.

सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ७९ लाखांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत. कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे ग्रामीण भागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सणसवाडी येथील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटवर अचानक छापा टाकला. या छाप्यात ८९८ ग्रॅम ९४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन सापडले.
या प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर येथील सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई याला अटक करण्यात आली आहे. सागरमल हा या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता आणि तेथूनच पुण्यातील औद्योगिक पट्ट्यात ड्रग्जचे जाळे पसरवत होता.
कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपीवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा पुण्यात आला कोठून? आणि यामागे मोठे आंतरराज्य रॅकेट आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.