Police Inspector Suspended : चौकशीत दिरंगाई भोवली, पोलीस निरीक्षकाचे बदलीनंतर निलंबन…
Police Inspector Suspended : दिघोरी नाक्याजवळ हिट अँड रनची घटना घडली होती. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील लोकांना मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला तर लहान बालक जखमी झाला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली. नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिघोरी टोल नाक्यावरील हे प्रकरण घडून ४८ तास लोटले आहेत. मात्र, तरी रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅब म्हणजे न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत कार चालकाचे ब्लड सँपल पाठवण्यात आले नाही.
यात झालेल्या कामाच्या कुचराईमुळे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी निलंबित केले आहे. विजय दिघे याच्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी आल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे आधी बदलीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी दिघे यांचे थेट निलंबन केले.
आरोपी चालकासह कारमध्ये सहा विद्यार्थी होते. त्यातील सर्वच जण दारूच्या नशेत वाढदिवस साजरा करून फिरायला निघाले होते. भूषण नरेश लांजेवार (वय -२० रा. दिघोरी) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. राजेंद्र बागडिया (वय.३४) यांच्या तक्रारीवरून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Police Inspector Suspended
या अपघातात कांतीबाई गजोड बागडिया (वय.४२) आणि सीताराम बाबूलाल बागडिया (वय.३० दोघे रा. करवर, अरियाली, जि. बुंदी, राजस्थान) यांचा मृत्यू झाला आहे. तर कविता बागडिया (वय.२८), बुलको बागडिया (वय.८), हसीना बागडिया (वय.३), सकीना बागडिया (वय- दीड वर्ष), हनुमान बागडिया (वय-35), विक्रम ऊर्फ भूषा (वय.१०) आणि पानबाई (वय.१५) अशी जखमींची नावे आहेत. मेडिकल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी हसीना आणि सकीना यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, वाठोडा पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपींना पकडले. इतर आरोपींमध्ये वंश राजू झाडे (वय. १९ रा. योगेश्वर नगर वाठोडा), सन्मय दिगांबर पात्रिकर (वय.२० रा. अंबानगर दिघोरी), अथर्व सरीता बानाईत (वय. २० रा. अयोध्यानगर हुडकेश्वर), ऋषिकेश धनंजय चौबे (वय. २०रा. रामेश्वरी अजनी), अथर्व मोगरे (वय२० रा. महाल) यांचा समावेश आहे. वंश हा बी. फार्मचे शिक्षण घेत आहे. तर इतर आरोपी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत. वंश याचा वाढदिवसाची घरी पार्टी केल्यानंतर सर्व मित्र भूषणच्या कारने फिरायला निघाले होते.