पुण्यात राज ठाकरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसात तक्रार…!
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे भाषण केले. यामध्ये ठाकरे यांनी भावना भडकावल्याचा आरोप करीत एका मुस्लिम तरुणाने पोलिसांत धाव घेतली आहे. पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
वाजीद रजाक सय्यद (रा. काळा खडक, वाकड) असे तक्रार केलेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रार अर्जात तरुणाने म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी सभेचे आयोजन केले. भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात भांडण होईल, असे शब्द वापरले. तसेच मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोचेल, असे वक्तव्य केले.
राज ठाकरे यांनी भाषण राजकीय दबावाखाली केले आहे. या भाषणामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात दंगे होऊ शकतात. त्यामुळे राज ठाकरेंवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, आगामी काळात अशा सभेला परवानगी देऊ नये. यापुढे माझ्या जिवाला थोडाही धक्का लागल्यास राज ठाकरे जबाबदार असतील.