पोलिस पाटलांना ऊसतोड मजूर आणून देतो म्हणून फसवणूक! लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : उसाच्या गुऱ्हाळासाठी ऊसतोड मजूर आणून देतो असे सांगून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलिस पाटलांची ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना २०२४ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोरचे पोलीस पाटील लक्ष्मण दशरथ काळभोर (वय ५९, रा. तरवडी, लोणी काळभोर ता. हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कालूसिंग पावरा व भाईदास पावरा (दोघे रा. तेलखडे ता.धडगाव, जि. नंदुरबार) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण काळभोर यांचा कृष्णाई गुळ उद्योग समुह या नावाने गुऱ्हाळ व्यवसाय आहे. ऑक्टोबर २०२४ पासून कालुसिंग पावरा हा त्यांच्या गुऱ्हाळावर काम करीत होता. एप्रील २०२५ मध्ये कालुसिंग याने सांगीतले की, आमच्या गावाकडे ऊसतोड मजुर आहेत. व माझा चुलत भाऊ भाईदास हा टोळीचा मुकादम आहे. त्याच्याकडे ओळखीचे ४० ते ५० कामगार असून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना घेऊन येतो.

कालुसिंग हा काम करीत असल्याने काळभोर यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तो कामगार आणण्यासाठी नंदुरबार गेला. गावाला गेल्यानंतर त्यानी काळभोर यांना फोन करून कामगार भेटले असून त्यांना २० हजार रुपये अँडवान्स पाठवून द्या. त्यानंतर काळभोर यांनी फोन पे वरून प्रथम २० हजार व दुसऱ्यांदा २ हजार रुपये पाठवून दिले.
यानंतर १० मे २०२५ रोजी कालुसिंग याचा काळभोर यांना पुन्हा फोन आला. त्यावेळी त्यांने ४० ते ५० कामगार जमवले असून त्यांना उचलेपोटी रक्कम द्यावी लागेल, त्यासाठी ५ लाख रुपये रोख घेऊन या असे सांगितले. कामगार मिळतील या अपेक्षेने काळभोर हे ५ लाख रुपये घेवून नंदुरबार येथे गेले. व त्यांनी कालुसिंग याच्यावर विश्वास ठेवून सदर रक्कम त्याच्याकडे दिली. रक्कम देताना काळभोर यांनी मोबाईलमध्ये शुटींग केले आहे. त्यानंतर ते घरी आले.
दोन दिवसानंतर काळभोर यांनी कालुसिंगला फोन करून मजुरांच्या संदर्भात विचारणा केली असता, त्याने लोकांची जुळवाजुळव झाली आहे. आम्ही दोन दिवसात सर्वजण येणार आहोत असे सांगितले परंतु ते आले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षांत आलेने याप्रकरणी लक्ष्मण काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.
