पोलीस प्रशासन सज्ज! निवडणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोणी काळभोर ठाण्याच्या स्तरावर फौंजफाट्यासह पोलिसांचा रूट मार्च

लोणी काळभोर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाणे स्तरावर मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला आहे.

गुन्हेगार आणि सामाजिक तत्वांवर दबाव निर्माण करण्यासाठी पोलिस अनेक उपाययोजना करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये ठाणे स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढला आहे.
सदरचा रूट मार्च – लोणी काळभोर पोलीस स्टेशन, आठवडे बाजार मैदान, लोणी फाटा, लोणी स्टेशन चौक, समता नगर, इंदिरानगर, पालखी तळ मैदान, पाषाणकर बाग, विठ्ठल मंदिर, आलमगीर मज्जित, सावता माळी मंदिर चौक, बिग बाजार चौक, खोकलाई देवी माता चौक, श्री दत्त मंदिर चौक, पोलीस स्टेशन या ठिकाणी समाप्त करण्यात आला.सदरचा रूट मार्ग शांततेत पार पडला.

या रूट मार्च करिता सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, ९ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ५६ अंमलदार, पीटर मोबाईल, वन मोबाईल, सी आर मोबाईल लोणी स्टेशन मार्शल हजर होते.
निवडणुकीच्या कालावधीत कायद्याचे पालन करत प्रशासनाला आवश्यक तेवढे सहकार्य करावे. याचबरोबर कोणतीही व्यक्ती जातीय तेढ निर्माण करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणी सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.