PMRDA : पीएमआरडीए विकास आराखड्याबाबत २४ ला होणार निर्णय, हालचालींना आला वेग…

PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्रारुप विकास आराखडा अंतिम करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आराखड्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी २७ तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
यावर २४ तारखेला चर्चा करून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पीएमआरडीए सभेत मंजुरी घेतली जाणार आहे. यामुळे यावर आतातरी अंतिम निर्णय येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच, त्याच दिवशी हा आराखडा नियोजन समितीच्या बैठकीत देखील सादर केला जाणार आहे. आराखड्याला प्राधिकरण आणि नियोजन समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा आराखडा राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
त्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल. दरम्यान, दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या आराखड्याला प्राधिकरण सभेची मंजुरी घेऊन राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
तसेच पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत महानगर नियोजन समितीचा अहवाल तयार आहे. शहरावर नागरीकरणाचा ताण वाढला आहे. तसेच हा ताण कमी करण्यासाठी पीएमआरडीएने ३० जुलै २०२१ रोजी प्रारुप विकास आराखडा प्रकाशित केला. यामध्ये पुणे आणि पिंपरीचा समावेश आहे. PMRDA
त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्याबाबत ६९ हजार २०० नागरिकांच्या हरकती, सूचना प्राप्त झाल्या. दाखल हरकती-सूचनांचे नियोजन करून नियुक्त तज्ज्ञ समितीने २ मार्च २०२२ पासून सुनावणी घेण्यास सुरुवात केली.
डिसेंबर-२०२२ मध्ये समितीकडून सुनावणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तज्ज्ञ समितीने प्रारुप विकास आराखडा पीएमआरडीएला सादर करताना २३ शिफारशी केल्या आहेत. त्यावर अभिप्राय नोंदवून पीएमआरडीएकडून हा आराखडा महानगर नियोजन समितीला सादर करण्यात आला.
समितीने त्याबाबत त्यांचा अहवाल तयार केला आहे. आराखड्याला अंतिम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाला सुरुवातीला सहा महिन्यांची आणि त्यानंतर आणखी एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत २७ तारखेला संपत आहे.