PM Modi : जम्मू काश्मीर विधानसभेत ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा ठरावाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदान करणार काय? नरेंद्र मोदी पुण्यात कडाडले ..
PM Modi : काश्मीरमध्ये राज्यघटनेचे रद्द झालेले ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी काश्मीर विधानसभेत संमत केला आहे. मी आपल्याला विचारतो की, काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लागू करा, ही कोणाची मागणी आहे? ही भाषा केवळ पाकिस्तानची होती. आज ती भाषा काँग्रेस बोलत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली.
कर्नाटकात काँग्रेस जनतेला खुलेआम लुटते आहे. तो लुटीचा पैसा महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवली जात आहे. महाराष्ट्राला वाचवायचे असेल, तर काँग्रेस नावाची आपत्ती दूर ठेवा, असे आवाहन करत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकारचा नारा दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील स. प. महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी संबोधित केले.
ते पुढे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात फिरत आहे. अशीच गर्दी, असाच उत्साह, हाच उमंग मला सर्वत्र दिसत आहे. पुणे शहराच्या रस्त्यावर मला हेच चित्र दिसले. त्यांचा नमस्कार घेत येताना मला उशीर झाला. रस्त्यावर इतकी गर्दी होती, की मी सर्वांचे समाधान करू शकलो नाही. ही गर्दी, हा उत्साह हेच सांगतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार.
दरम्यान, शेवटी मोदी म्हणाले, मी आव्हान देतो या काँग्रेस अन् महाविकास आघाडीला की, वीर सावरकरांची जरा स्तुती करून दाखवा, त्या काँग्रेसच्या युवराजाला माझे आव्हान आहे की, वीर सावरकर आणि बाळासाहेबांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेसला नीती, नियत आणि नैतिकता नाही. काँग्रेस केवळ सत्तेसाठी दिशाभूल करत आली आहे.