महाराष्ट्रात प्लॅस्टिक फुलांवर अखेर बंदी, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…
,

पुणे : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच प्लास्टिक फुलांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यत होणाऱ्या बैठकीत याबाबत नरिणय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
दरम्यान, या मागणीला १०५ आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे.

आमदार रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते.
या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.