कोकण ट्रिपचा प्लॅन करताय? तर आधी ही बातमी वाचा, पर्यटकांना महत्त्वाच्या सूचना, जाणून घ्या…

मुंबई : कोकणात पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी… पुढील काही दिवस विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे हलक्या पावसासह दाट धुके पसरल्यामुळे प्रवास आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम होत आहे.

त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी दक्ष राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी अनेक ठिकाणी घनदाट धुके आढळून आले.
या हवामान परिस्थितीमुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, धुके म्हणजे वातावरणात पाणी किंवा बर्फाचे अतिशय सूक्ष्म कण तरंगत राहणे, ज्यामुळे दूरवरचे दृश्य स्पष्ट दिसत नाही. साधारणपणे एक किलोमीटर अंतरावरील वस्तू दिसेनाशा झाल्यास ती धुक्याची स्थिती मानली जाते. २०० ते ५०० मीटरपर्यंतचे दृश्य अस्पष्ट झाल्यास मध्यम प्रकारचे धुके समजले जाते. ५० ते २०० मीटर दरम्यानचे अंतर न दिसल्यास दाट धुके मानले जाते, तर ५० मीटरपेक्षा कमी अंतरावरील दृश्य नजरेस न पडल्यास ते अतिदाट धुके समजले जाते.
प्रशासनाने केले आवाहन…
प्रवास करताना मुख्य रस्त्यावर वाहन थांबवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जर वाहन थांबविण्याची वेळ आलीच तर फॉग लाईट किंवा पार्किंग लाईट सुरू ठेवून इतर वाहनचालकांना आपली उपस्थिती जाणवेल याची खात्री करावी.
वाहन चालवताना अडचण निर्माण झाल्यास रस्त्याच्या कडेला सुरक्षित जागी गाडी उभी करून हॅझर्ड लाईट सुरू ठेवावेत. डिफॉस्टर व विंडस्क्रीन वायपरचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. फॉग लाईट किंवा लो-बीम हेडलाईट वापरणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
समोरच्या वाहनापासून पुरेसे अंतर ठेवून नियंत्रित वेगात वाहन चालवावे. अचानक ब्रेक लावण्याची वेळ येऊ शकते, याची जाणीव ठेवून सजग राहावे. अनावश्यक ओव्हरटेक टाळणे आणि लेन शिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये…
मोबाईल फोनचा वापर टाळावा. दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी चालकांनी सीट बेल्ट वापरणे बंधनकारक आहे. पहाटे व उशिरा रात्री प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी.. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार पिके व फळबागांची निगा राखावी आणि हवामानाची अद्ययावत माहिती भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरून घ्यावी.
अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. कोणतीही माहिती खात्री करूनच स्वीकारावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०२३६२/२२८८४७, टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.