Pimpri Crime : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत महिलेला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; घडली धक्कादायक घटना
Pimpri Crime : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आणि मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखत महिलेची चार लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे परिसरात उघडकीस आला. Pimpri Crime
याप्रकरणी महिलेने तळेगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गावडे नावाची महिला आणि राजेश चव्हाण (रा. चिंचवड) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या आयुर्वेदिक उत्पादने विक्रीची कामे करतात. महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेशने बँकेत नोकरीला असल्याचे सांगितले. फिर्यादी, त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले.
फिर्यादीच्या मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चार लाख रुपये घेतले. कर्ज मंजूर न केल्याने आणि मुलीला नोकरी न लावल्याने आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मोबाईल फोन बंद करुन ठेवला. महिला मंत्रालयात आणि राजेश बँकेत कामाला नसल्याचे समजताच पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.