पिंपरी चिंचवड हादरले ; विवाहित प्रियकराच्या संशयाचे रूपांतर क्रूर हल्ल्यात, प्रेयसीवर चॉपरने वार…..


पुणे : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयामुळे पिंपरी चिंचवड मध्ये एका प्रियकरांने मित्राच्या मदतीने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिजवडी परिसरात झालेल्या या चॉपर हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ साखरे वस्तीजवळ वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे.मुख्य आरोपी योगेश भालेराव याचे १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. महत्त्वाचे म्हणजे योगेश विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते. योगेशला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा तीव्र संशय होता. याच संशयाच्या भावनेतून योगेशने प्रेमाचे नाते विसरून सूड घेण्याचा कट रचला. तरुणीवर मुख्य आरोपी योगेश भालेराव आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तरुणीवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. ज्यामुळे ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.यानंतर काही नागरिकांनी जखमी तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाकडून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर योगेश भालेराव, त्याचा साथीदार प्रेम वाघमारे आणि या कटात सामील असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवडसारख्या आयटी हबजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!