पिकअपची धडक, कारचा चुराडा, राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचा मृत्यू, जागेवरच मृत्यूने गाठलं


हिंगोली : येथील औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता भागात एक भीषण अपघात झाला. पिकअप आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये पिकअप आणि कारच्या अपघातात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

हिंगोली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हे आपल्या कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी त्यांची कार आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला.

अपघातात कारचे इंजिन कारमधून बाहेर पडले आहे. २५ वर्षांचा अजिंक्य घुगे हा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचा भाचा होता. वाहनाच्या धडकेचा आवाज झाल्याने परिसरातील संतुक पिंपरी लिंबाळा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती कळताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेचा पंचनामा केला. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची रात्री उशिरा नोंद घेण्यात आली. याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!