पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा शारीरिक अन मानसिक छळ ; काय आहे प्रकरण?

पुणे : कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.या महिलांनी पोलिसांनी पदाचा गैरवापर, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरमधील 23 वर्षीय विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्या पुढे आल्या. त्यांनी पीडीतेला स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य विकास कोर्ससाठीही मदत केली. मात्र त्या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे पोलिसांची मदत घेतली. त्यांनी कोणत्याही वॉरंटशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय, कोथरूड पोलिसांनी तीन महिलांच्या घरी छापा टाकून त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं.त्यांना वेगळ्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ केली.
कोथरूड पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू महार-मांगाची आहेस म्हणून असे वागते का?, “तू रांड आहेस”, “मुलांसोबत झोपतेस का? “तुम्ही सगळे LGBT आहात का?” अशी अपमानास्पद भाषा वापरण्यात आली, असा आरोप महिलांनी केला आहे.
याप्रकरणी महिलांनी मानवी आणि कायदेशीर हक्कांच्या पायमल्ली विरोधात तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही.आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.