फोटो, रिल्सने अजित पवार यांच्या जवळीकचा वेगळाच भास! वैयक्तिक हेतू साध्य करण्याचा शक्कलीचा कार्यकर्त्यांनी मांडलाय बाजार…

जयदिप जाधव उरुळीकांचन : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ‘अच्छे दिन’ आले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाची गच्छंती झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र अनपेक्षित झालेल्या विजयाने जिल्ह्यात बॅक सिटवर चाललेली राष्ट्रवादी फ्रंटसिटवर आली आहे. भाजपच्या मदतीने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जिल्ह्यात मित्रपक्ष म्हणून अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे कधी आघाडी असो की युती अजित पवार यांचा सत्तेचा सारीपाठ सुरूच असल्याने कार्यकर्ते ही त्यांच्या भूमिकेशी सहमत होऊन सत्तेत सहभागी होत आहे. कायम सत्तेच्या बाजूने असल्याने कधी विरोधी आंदोलनाची झळ कार्यकर्त्यांवर न आल्याने अजित पवार यांचे कार्यकर्ते सत्तेचा उपयोग चांगल्या पद्धतीने घेत असल्याची उदाहरण आहेत. मात्र आता या कार्यकर्त्यांकडून ‘दादांची’ अधिक जवळीक असल्याचे भासवून देण्यासाठी रिल्स व फोटोशेशनचा सोशलमीडियावर भडीमार वाढल्याने या हेतू साध्य करण्याचा प्रसिद्धीची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपद व महायुतीच्या सत्तेच्या प्रयोगाने पुणे जिल्ह्यात सर्वेसर्वा अधिकार अजित पवार यांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या साहजिकच गर्दी वाढली असली तरी सामान्यांऐवजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पर्यायाने चुमकू कार्यकर्त्यांचा गराडा वाढू लागला आहे. अजित पवारही या गर्दीत आवेशाने बोलू लागले असून या गर्दीत टिंगल, मिस्करी व शैलीत गर्दीचा सामना करीत आहे. मात्र या गर्दीत राष्ट्रवादीच्या बिनकामी चमकू कार्यकर्ते भाव वाढून घेत असून रिल्स, फोटोशेशन करुन सोशल माध्यमातून टाकत असून या उपद्रवी पराक्रमामुळे सामाजिक कोणतेही हित नसलेल्या या कार्यकर्ते मात्र फुकटची प्रसिद्धी मिळून घेत आहेत.
सोशल मिडिया हा असा एक ट्रेंड आला आहे की मी कसा सर्वश्रेष्ठ,स्वतः ची ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने नेतेमंडळीजवळीक दाखविण्याची जणु स्पर्धा सुरू झाली आहे. आई वडीलांचे कधी फोटो न टाकणारी मंडळी मात्र आपला रुतबा दाखविण्यासाठीनवनवे फंडे वापरण्यास ही करामती मंडळी प्रयत्न करताना दिसत आहे.समाजात ओळख निर्माण करण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून आभासी जग भासवीत आहे. या प्रकारात राष्ट्रवादीच्या नवीन पिढीतील मंडळी चांगलीच तरबेज असून अजित पवार यांच्या कलेक्शनचा सर्वाधिक बोलबाला या मंडळींनी केला आहे.
पालकमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या बारामती मतदारसंघात अशा मशहूर मंडळींचा अनुभव आला असून सामान्य नागरीकांच्या तक्रारीनंतर त्यांनी हे बिनकामी लोक बाजूला केले आहे. अजित पवार यांना जनतेने निकालात परिस्थिती सावरून घेण्यास भाग पाडले असल्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा चापलूशी कार्यकर्त्यांची बारामतीत चमक झाली आहे. मात्र अजित पवार यांना जिल्ह्यातही याच समस्येला फेस करावे लागत असून बिनकामी कार्यकर्ते त्यांच्या भोवती वावरत आपली छबी निर्माण करीत असल्याने सामान्य जनतेत मात्र वेगळाच संदेश या निमित्ताने जात आहे. त्यामुळे अजित पवार हे बारामतीचा धडा जिल्ह्यात गिरविणार का, सामान्यच चर्चा करू लागले आहेत.
सध्या सोशल मिडीयात चमकत असलेल्या या मंडळींचे सर्व उद्योग ‘दांदां’ ना माहिती आहे की नाही असाही एक प्रश्न निर्माण होत असून कधी मंत्रालय, कधी जिल्हा मुख्यालय तर कधी पोलिस मुख्यालय अशा ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत वावरणारी ही मंडळी नेमकी कोणते सामाजिक कार्ये करीत आहेत ,याचे संशोधन राष्ट्रवादीची प्रमुख मंडळी अजित पवार यांच्यावर कानावर टाकणार का म्हणून राष्ट्रवादीची प्रामाणिक कार्यकर्ते उघड बोलत आहे.
हवेलीकर सर्वात आघाडीवर…
अजित पवार यांच्या दौऱ्यात सध्या हवेलीचा सर्वाधिक राबता राहिला आहे. हि मंडळी तालुक्यातच नव्हे तर पुणे, मुंबई तसेच दिल्लीतही दांदांची पाठ सोडायला तयार नाहीत. पक्षासाठी कसल्याही प्रकारचे योगदान नाही ,पक्षासाठी निष्ठा नाही परंतु दादांच मन ओळखण्यात तरबेज असलेल्या मंडळींना जमिनीवर आणा, अशी मागणी पक्षातीलच मंडळी करु लागली आहे.