मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; काय आहे प्रकरण?

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी सक्तीचा मुद्दा उचलून धरल्याने भाषेच्या मुद्द्यावर रंगत असलेला वाद अधिकच तीव्र होत चालला आहे. या मराठी सक्तीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका आता सर्वोच्च न्यायालय दाखल झाली आहे. ही याचिका महाराष्ट्रातील रहिवाशी घनश्याम दयालू उपाध्याय यांनी दाखल केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांच्या पक्षाची निवडणूक आयोगातील नोंदणी रद्द करावी. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांच्या विरोधात हिंसाचार करत आहेत. हा प्रकार संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी प्रकरणात दिलेल्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच दाखल केलेल्या याचिकेत ललिता कुमारी प्रकरणाचा निर्णयाचे दिशानिर्देश संपूर्ण देशभरात लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत वकील घनश्याम दयालू यांनी महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुद्धा पक्षकार बनवले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अधिकार वापरत राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
