‘येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो’, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष..


मुंबई : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सूरज चव्हाण हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं. शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर सूरजने महाराष्ट्रातील घराघरांत आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. त्याचा सरळसाधा स्वभाव प्रत्येकाला भावला.

सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकून बिग बॉस मराठीच्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लवकरच सूरजला घेऊन सिनेमा बनवणार ही मोठी घोषणा केली होती आणि आता हा ‘गुलीगत किंग’ रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

सूरज चव्हाण याचा ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून तो सध्या जोरदार चर्चेत आहे. “येडा बनवून जातात लोक आणि मी बनतो” या डायलॉगमुळे हा टीझर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.या टीझरमध्ये सूरज चव्हाणचा कॉमेडी अंदाज, हटके स्टाईल आणि जबरदस्त अभिनय दिसून येतो. चित्रपटात त्याची लव्हस्टोरी दाखवण्यात आली असून तो एका मुलीच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट होते.

टीझरमध्ये “मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे” असे संवाद ऐकायला मिळतात. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक भन्नाट मनोरंजनाचा अनुभव देणार आहे. सूरज चव्हाण हा एका गरीब कुटुंबातून येऊन बिग बॉस मराठी जिंकणारा कलाकार आहे. त्याने आपल्या मेहनतीने नाव कमावले असून ‘झापुक झुपूक’ हा त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. एका ग्रामीण भागातून आलेल्या या मुलाने मोठ्या पडद्यावर आपले स्थान निर्माण केले असून त्याच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

दरम्यान, या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group