लक्ष द्या…मुलांसोबत बोलताना ‘या’ गोष्टी टाळा, त्यांच्या मनावर होतो वाईट परिणाम…

Children : लहान मुलांशी बोलताना विचार करणे खुप गरजेचे आहे. कारण त्याचे मन आणि हृदय कोमल असते. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना प्रत्येक पालकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तसेच काही वेळा पालक, घरातील मोठी मंडळी किंवा शिक्षक मुलांना रागात किंवा मस्करीत काहीतरी बोलून जातात. मात्र, त्या शब्दांचा मुलांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. त्यांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होऊन ते भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे मुलांशी संवाद साधताना योग्य शब्दांची निवड करणे गरजेचे आहे.
मुलांची तुलना इतरांशी करू नका..
मुलांची तुलना कायम इतर मुलांशी केली जाते. पहा, शेजारच्या मुलाने किती चांगले गुण मिळवले, किंवा तुमच्यापेक्षा दुसरी मुले खूप हुशार आहेत. अशा प्रकारच्या विधानांमुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. ते स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजू लागतात आणि त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे प्रत्येक मुलाचे कौशल्य वेगळे असते हे समजून घेऊन त्यांना त्यांच्या गतीने पुढे जाण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

मुलांना मूर्ख किंवा अयोग्य ठरवू नका…
बऱ्याचदा मुलांशी बोलताना पालक चुकूनही म्हणतात, तू खूप मूर्ख आहेस, किंवा तुला काहीच कळत नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मुलं स्वतःला कमी लेखू लागतात आणि त्यांना वाटू लागते की ते काहीही योग्य करू शकत नाहीत. त्यामुळे, मुलांना मूर्ख किंवा अयोग्य ठरवण्याऐवजी, त्यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. योग्य शब्दांद्वारे त्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
पालकांनी मुलांसोबत सकारात्मक संवाद साधावा..
मुलांच्या मानसिकतेवर सकारात्मक प्रभाव पडावा यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत संवाद साधताना अधिक विचारपूर्वक शब्द वापरणे गरजेचे आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते यशस्वी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात. त्यामुळे मुलांसोबत संवाद साधताना काळजीपूर्वक शब्दांची निवड करावी
नकारात्मकतेची भावना निर्माण करू नका…
काही पालक मुलांना म्हणतात, तू कधीच काहीच करू शकणार नाहीस, किंवा तुमच्यासारखी मुले कधीच यशस्वी होत नाहीत. अशा विधानांमुळे मुलांमध्ये नकारात्मक विचारांची रुजवात होते. अशा गोष्टी ऐकून ते स्वतःबद्दल वाईट वाटून घेतात आणि त्यांच्या मनात अपयशाची भीती निर्माण होते. यामुळे, त्यांच्यात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करण्याऐवजी, ते स्वतःला दुर्बळ समजू लागतात.