पवारांची पावर तर मोदींचा मोठेपणा!! स्वतः खुर्ची दिली, पाणीही दिलं, दिल्लीतील कार्यक्रमात मोदी आणि पवारांचा व्हिडिओ व्हायरल, घडलं काय?


नवी दिल्ली : दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘स्वागताध्यक्ष’ या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले. यावेळी आसनावर बसताना मोदींनी पवारांची खुर्ची धरत मनाचा मोठेपणा दाखवून दिला. तसेच पाणी देखील दिले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पवारांची पावर आणि मोदींचा मोठेपणा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

यावेळी शरद पवार म्हणाले, ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटक, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उशा तांबे, ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली त्या डॉ. तारा भवाळकर, केंद्र सरकारचे आपले प्रतिनिधी प्रताप जाधव उपस्थित आहेत. आज मराठी सारस्वतांची दिंडी दिल्लीला आली, याचा मला मनापासून आनंद आहे.

मराठी माणूस हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या पराक्रमाचा झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीमध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, इंदोरमध्ये दिसतो, ग्वाल्हेरमध्ये दिसतो, गुजरातमधल्या अनेक शहरांमधून दिसत असतो. नोकरी-कामाच्या निमित्ताने काही लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतात. भीमथडीच्या तट्टांनी जसं यमुनेचं पाणी चाखलं, त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी यमुनेच्या तीरावर जमलो आहोत याचा मला मनापासून आनंद आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होतंय. विशेषतः या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. आजचं साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीने आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होतंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीने मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो.

१९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी त्या काळातील महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. त्यांचं स्मरण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. जवाहरलाल नेहरू यांनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं, त्याचीच पुनरावृत्ती होताना ७० वर्षांनी या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे.

एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो, तेव्हा त्यांनी अक्षरशः एक मिनिट सुद्धा घालवला नाही. महाराष्ट्राचा हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही कामाला लागा. आपल्याकडे चंद्रभागेच्या काठी आषाढी आणि कार्तिकेला जसे लाखो वारकरी भक्तीभावाने जमतात, त्याच पद्धतीने साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्यप्रेमी दरवर्षी येत असतात.

देशाच्या राजधानीत होणारं हे साहित्य संमेलन तुमच्या-माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. ३७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे, मराठी विश्वकोशाकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्यांनी त्याच वेळेला ज्याचा उल्लेख मी केला ते काकासाहेब गाडगीळ हे स्वागत अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी आज माझ्याकडे आली, याचा मला आनंद आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!