पटेल-तटकरेंना NCP चा ताबा मिळवायचा होता ; थेट पत्र दाखवत रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातानंतर पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा अनेक वेळा पत्रकार परिषदेतून केला आहे. त्यांच्या लढ्याला अखेर यश येत कर्नाटकात याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे.यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी असं म्हटलं आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या पक्षावर ताबा हवा होता. सगळं आधीच ठरलं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजितदादांच्या मृत्यूनंतर 18 व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रीजमोहन श्रीवास्तव या तीन लोकांच्या सह्या आहेत. यात त्यांनी कार्याध्यक्ष यांना पक्षाचे सगळे अधिकार आहेत, असं सांगितलं. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना कोणतीही कल्पना न देता हे पत्र देण्यात आलं असं देखील त्यांनी म्हटलं.
अजित पवारांच्या विमानाचा घटनाक्रम पाहिला तर असं दिसतं की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर पक्षाचे काही मोठे नेते यांच्यात कदाचित या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, तटकरे अजितदादांच्या अंत्यविधीला काय हेतू मनात घेऊन आले होते, 27 जानेवारीला बैठकीला उशीर का झाला? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारताच त्यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला. अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकचा भोंदूबाबा खरातकडून ही पूजा करण्याचा प्रयत्न झाला. अशी काळीजादू करण्यामागे पक्षावर नियंत्रण मिळवण्याचं कारण होतं का? त्यानंतर 28 तारखेला त्यांचा अपघात झाला की घातपात ? याचा शोध आम्ही घेत आहोत असंही रोहित पवार म्हणाले.