Passport : देशात ५ दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद, नेमकं कारण काय? नवीन पासपोर्ट कधी मिळणार, जाणून घ्या…
Passport : नवीन पासपोर्ट घेण्यासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरातील पासपोर्ट सेवा ५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक ॲडव्हायजरी जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे.
तांत्रिक देखभालीमुळं पासपोर्ट सेवा पोर्टल आजपासून म्हणजे २९ ऑगस्ट रात्री ८ वाजल्यापासून ते २ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचे विभागाने म्हटले आहे. या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाहीत. तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत.
दरम्यान, एखाद्याला जर नवीन पासपोर्ट काढायचा असेल तर आता तुम्हाला १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचवेळी, जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल, तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल. Passport
या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व MEA/RPO/BOI/ISP/DOP/पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसेल, असे पासपोर्ट विभागाने ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.
पाच दिवस विभागाचे कोणतेही काम होणार नाही. सेवा बंद झाल्याचा परिणाम पासपोर्ट सेवा केंद्र तसेच स्थानिक पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दिसून येईल.