प्रवाशांना फटका ; मुंबई -पुणे कॅबच्या प्रवासात 50 टक्क्यांची वाढ होणार, ओला -उबरच्या संपानंतर सरकार घेणार मोठा निर्णय

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ओला उबेर चालकांच विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसापूर्वी ओला उबेर चालकानीं संप देखील पुकारला. या संपानंतर राज्य सरकारकडून आधारभूत भाड्यामध्ये ५० टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव सूचवला आहे. त्यानुसार या प्रस्तावावर राज्य सरकार आणि ओला-उबर यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अॅप-आधारित प्रवास ५० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालक युनियन्सच्या संपानंतर दरवाढीमध्ये सुधारणा सुचवण्यात आली आहे. अॅप-आधारित कॅब भाडे आणि पारंपरिक ‘काळी-पिवळी’ टॅक्सी भाड्यांमध्ये समानतेची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.अॅप-आधारित प्रवासात आधारभूत भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्यास मुंबई आणि पुण्यातील प्रवासाची किंमत वाढेल. मुंबईमध्ये कॅबचा दर प्रति किलोमीटर १६ रुपयांवरून २४ रुपये होईल. पुण्यातही प्रति किलोमीटर १२ रुपयांवरून १८ रुपये होईल. ही दरवाढ झाल्यास मुंबई, पुण्यात कॅबने प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान ओला उबेर चालकांच्या संपानंतर राज्य सरकारने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला असल्यामुळे लवकरच मुंबई पुण्यातील कॅबचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.