Paris Olympics 2024 : अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सुपुत्राचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका, भारताला तिसरं पदक..

Paris Olympics 2024 : भारताला नेमबाजीत तिसरे पदक मिळाले आहे. कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे यानं ५० मीटर रायफल ३ पोजीशनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय शूटर स्वप्निल कुसाळे यानं नीलिंग पोजिशनमध्ये चांगली कामगिरी केली.
सलग चार शॉट १० पेक्षा जास्त गुणांचे होते. सहाव्या फेरीनंतर स्वप्निल पाचव्या स्थानी पोहोचला होता. पण नंतर त्याने ४३ शॉटनंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली. स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या कामगिरीनंतर कोल्हापूर येथे एकच जल्लोष करण्यात आला.या स्पर्धेत स्वप्निलने एकुण ४५१. ४ गुण प्राप्त केले.
तर, चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकले. त्याचे गुण ४६३.६ होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं आहे. भारताकडून स्वप्निलने कांस्य पदकावर नाव कोरले आहे. यामुळे देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दरम्यान, स्वप्निल कुसळे हा महाराष्ट्राचा सुपुत्र असून तो कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. तो २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्निल कुसळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत विजयी कामगिरी केली. Paris Olympics 2024
महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिकवीर मिळालाय. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर आता स्वप्निल कुसळेने अशी कामगिरी केलीय. त्याच्या या यशामुळे महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.