पालक धास्तावले ; दहावीच्या विद्यार्थ्यांनीवर स्कूल बस चालकाकडूनच अत्याचार, आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी..

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आता दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावातून समोर आली आहे. पालक विश्वासाने ज्याच्यासोबत लेकीला शाळेत पाठवत होते, त्यानेच घात केल्याने पालक धास्तावले आहेत. या घटनेने परिसरातुन संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अबिद हुसेन शेख जलील, राहणार शेंदुर्णी, असे 38 वर्षीय आरोपी बस चालकाचे नाव आहे. त्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीवर अत्याचार केला. यामुळे मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मला तू आवडतेस, असं सांगत आरोपी तिचा पाठलाग करत असे, तसंच फोनवरुन तिला अश्लील शिवीगाळही करत असल्याचा आरोप आहे.त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीने गुरुवारी पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे, की बस चालकाने माझ्यावर माळेगाव, तालुका जामनेर, येथील शेतात नेऊन बलात्कार केला. आरोपी हा मुलीला फोनवरुन वारंवार धमकावत असे आणि अश्लील भाषेत बोलत छळ करत असे. संबंधित गावातून दररोज 50 ते 60 विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूल बस ने ये-जा करतात. त्यामुळे बस चालकाने याआधी इतर कोणासोबतही गैरवर्तन केले आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. याप्रकरणी पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे
