पालघर सदिच्छा साने हत्या प्रकरणातील आरोपी मिट्टू सिंहची कबुली, सेल्फी काढून हत्या केली ! नंतर मृतदेह समुद्रात फेकून दिला…!
मुंबई : पालघरच्या एमबीबीएसला शिकणाऱ्या 22 वर्षीय सदिच्छा साने बेपत्ताप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात त्याने ही कबुली दिली आहे.
पालघरच्या बोईसरमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी सदिच्छा साने ही 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर बँडस्टॅन्ड पोलीस स्टेशन बांद्रा इथे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं होतं.
आरोपी मिट्टू सिंगने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याची दिली कबुली दिली आहे. त्यामुळे तब्बल 14 महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लागला आहे. मृत सदिच्छा साने आणि आरोपी मिट्टू सिंहने बँड स्टँडला शेवटचा सेल्फी काढला होता. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. मात्र मुलगी गेली कुठे हे अजून त्यांना तपासात निष्पन्न झालं नव्हतं. पोलिसांनी दोघांना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केले होते पण आता त्यात हत्येचे कलम जोडले जाणार आहे. आरोपीच्या कबुलनाम्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या का करण्यात आली याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी हत्येसाठी कलम 302 आणि पुरावे नष्ट करण्यासाठी 201 कलम जोडले आहे.
दरम्यान मुंबई पोलिस आणि नौदलाच्या अधिकार्यांच्या मदतीने शुक्रवारी समुद्रात मुलीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे. आरोपी सिंहने आपल्या जबाबात दावा केला आहे की, त्याने मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुमारे 150 ते 200 मीटर अंतरावर बँडस्टँडजवळ समुद्रात फेकून दिला. मात्र त्याने तिची हत्या कशी केली आणि त्यामागचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.