औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १३ मार्चपासून व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन


पुणे :  कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक- युवतीसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे १३ मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन तसेच बौद्ध, नवबौद्ध, हिंदू-महार या घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये फील्ड टेक्निशियन- एसी, सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यापैकी फील्ड टेक्निशियन- एसी हा अभ्यासक्रम १३ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे. या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्याचा आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (भ्र.ध्वनी क्र. ९८५०१५१८२५), जे. आय. गवंडी ( ८०८७१५०५०५) व सोहेल शेख ( ९६३७३९५८३३) यांच्याशी संपर्क साधावा. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!