पुण्यात गारांसह मुसळधार पावसाचा कहर; राज्यात पुन्हा ‘ऑरेंज अलर्ट’, पुढील दोन दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा…


पुणे : पुणे शहरासह आसपासच्या भागात बुधवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या तीव्र उकाड्यानंतर गारांसह आणि वेगवान वाऱ्यांसोबत झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात लक्षणीय गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने गुरुवार, २ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी गारपीट आणि वादळी वाऱ्याचा गंभीर इशारा जारी केला आहे.

बुधवारी झालेल्या अवकाळी पावसात सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव आणि खराडी या भागांना गारपिटीचा मोठा फटका बसला. अचानक कोसळलेल्या गारांसह पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २ एप्रिल रोजी राज्यात पुन्हा एकदा तीव्र हवामानाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी प्रशासनाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, ३१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या उपग्रह चित्रांनुसार मुंबई आणि पुणे विभागावर ढगांचे मोठ्या प्रमाणात आच्छादन निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणारे ढग वेगाने दक्षिणेकडे सरकत असून त्याचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम भारतावर जाणवणार आहे.

परिणामी, डोंगराळ भागांसह काही शहरांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कल्याण-बदलापूर, ठाणे आणि मुंबईत पावसाची शक्यता तुलनेने कमी असली तरी लोणावळा आणि पुण्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. मार्चमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला तापमानाचा पारा आता ३२ ते ३३ अंशांदरम्यान स्थिरावला आहे.

तापमानाच्या नोंदींनुसार, बुधवारी अमरावती जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे तापमानात मोठी घसरण होत १७.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी पातळीवर नोंद करण्यात आली.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील हवामानात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, वातावरणातील अचानक बदल आणि पावसाचा अंदाज लक्षात घेता हवामान विभागाने पुणे शहर व जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!