शिरुर-हवेलीत अजित पवार यांना भाजपकडून विरोध ! मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यासाठी तीव्र विरोध …..
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही म्हणून त्यांनी स्पष्ट केल्यानंतर ते कोठून निवडणूक लढणार म्हणून चर्चांचा धुराळा काही खाली उतरत नाही. बारामती नंतर खडकवासला , कर्जत -जामखेड नंतर अजित पवार हे शिरुर-हवेली मतदारसंघात निवडणूक लढणार म्हणून नव्या चर्चांचा खल सुरू झाला आहे. मात्र अजित पवार यांच्याकडून निवडणुकीची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याने ही वावडी उठल्यानंतर आता शिरुरच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र त्यांना विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे.
पुणे जिल्ह्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सामील झाल्यानंतर पुणे जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांना पक्षाने मोठी पदे देऊनही त्यांनी भाजपची साथ सोडली आहे. तर दौंडचे आमदार राहुल कुल वगळता इतर कोणताच मतदारसंघ भाजपला सुटण्याची खात्री उरली नाही. मात्र अजित पवार हे भाजपच्या एकेकाळी जनसंघ व भाजपच्या रुपाने आमदारकी दिलेल्या या मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. मात्र अजित पवार यांना या मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लढण्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
अजित पवारांनी आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. ‘मी निवडून दिलेल्या उमेदवाराला निवडून द्यावे’, त्यामुळे बारामतीतून पुन्हा एकदा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. त्यामुळे साहजिकच चर्चांची प्रक्रिया खडकवासला, कर्जत -जामखेड नंतर शिरुर -हवेलीत येऊन थांबली आहे.
शिरुर-हवेलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना या पक्षाकडून उमेदवारी निश्चित आहे. तर भाजपकडून प्रदिप कंद व शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याकडून माऊली कटके हे तीव्र इच्छुक आहे.
पारंपारीक जागावाटपात महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार आहे. मात्र भाजपने हा मतदारसंघ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार हा दावा अजित पवार गटाने केला आहे. मात्र त्यांच्याकडे संभाव्य लढत देईल असा उमेदवार नसल्याने हा मतदारसंघ भाजपने माघितला आहे.
भाजपने अद्याप मतदारसंघावरील दावा सोडला नाही. अशातच अजित पवार यांच्या चर्चांला भाजपने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातील स्थानिक मुद्दांवर शिरुर तालुक्यात मोठी आंदोलने सुरू केली आहे. मतदारसंघातील साखर कारखाने बंद पाडण्याचा मुद्दावर आमदार अशोक पवार यांना विरोधकांनी घेरले आहे .