एक डाव अन् बिहारमध्ये मोठा गेम…आता नितीश कुमार 10व्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ? महत्वाची माहिती समोर आली..

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने नितीशकुमार यांना दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं असून नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारच्या गादीवर विराजमान होणार असल्याचे म्हटले जात आहे.

एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा नितीशकुमार हेच सर्वात मजबूत दावेदार म्हणून समोर आले आहेत. बिहारची सत्ता पुन्हा त्यांच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, राज्यात नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तसेच 3 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा केवळ सात दिवसांसाठी मुख्यमंत्री राहिलेल्या नितीशकुमारांनी तब्बल दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे.

एनडीएच्या विजयामागे सर्वात परिणामकारक ठरलेला मुद्दा म्हणजे नितीश सरकारची ‘मुख्यमंत्री महिला उद्योजिका योजना’. या योजनेत राज्यातील तब्बल 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट 10 हजार रुपये जमा करण्यात आले.
निवडणुकीच्या तोंडावर 29 ऑगस्ट 2025 रोजी नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. विरोधकांनी याला मतांसाठीचा “डायरेक्ट कॅश गेम” म्हणत टीका केली होती, मात्र निकालाने सिद्ध केलं की ही योजना मतदारांच्या नाराजीवर थेट मलमपट्टी करणारी ठरली.
बिहारमध्ये एकूण महिला मतदारांची संख्या 3.6 कोटी आहे, त्यापैकी 1.5 कोटी महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा झाल्याने मतदानात महिलांचा सहभाग तब्बल 71 टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात येते.
या योजनेचा परिणाम थेट 4 ते 5 कोटी कुटुंबांवर झाला असून, “ही रक्कम परत करायची नाही” हे स्पष्ट होताच महिलांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दाखवले. अनेकांनी या पैशातून छोटा व्यवसाय, विक्री केंद्रे, घरगुती उद्योजकता सुरू केली आणि पुढे 2 लाख रुपये कर्ज उपलब्ध होईल, यामुळे या योजनेवर अधिक विश्वास निर्माण झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 26 ऑक्टोबर 2025 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यानंतर हा आकडा दणदणीत वाढत 1.5 कोटींवर पोहोचला.
मुलींना मोफत सायकली, पंचायतीत 50 टक्के आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के आरक्षण अशा अनेक उपाययोजना महिलांसाठी आधीच दिलेल्या आहेत. त्यामुळे नितीशकुमारांविषयी महिलांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला असून, या विश्वासानेच एनडीएला मोठा फायदा करून दिल्याचे मानले जात आहे.
नितीशकुमार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 2000, 2005, 2010, 2015, 2017, 2020, 2022, 2024 या कार्यकाळांत मुख्यमंत्रीपद भूषवले आणि आता 2025 मध्ये दहाव्या कार्यकाळाची शक्यता जोर धरत आहे. जरी त्यांनी राजकीय प्रवासात अनेकदा आघाड्या बदलल्या, कधी भाजपसोबत तर कधी महागठबंधनसोबत गेले, तरी जनतेचा विशेषतः महिलांचा विश्वास त्यांनी गमावलेला नाही.