उरुळी कांचन येथे पेटलेला फटाका चुकवताना झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातातील एकाचा मृत्यू…
उरुळी कांचन: रस्त्यावर पेटवलेला फटाका वाचवताना झालेल्या दोन दुचाकींचा अपघातातील एकाचा आज गुरुवारी (ता. 07) दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोडवरील जुन्या एचडीएफसी बँकेसमोर रविवारी (ता. 03) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.
प्रतीक संतोष साठे (वय- 20, रा. भवरापूर, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर यातील चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- 18, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- 20) अशी जखमींची नावे आहेत.
यातील यातील सिद्धांत सातव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र त्याची परिस्थिती चांगली आहे. तर प्रतीक साठे याच्या पोटात गंभीर जखम झाली होती. त्याच्यावर मागील चार दिवसांपासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. होतकरू असलेल्या प्रतिकच्या जाण्याने उरुळी कांचनसह भवारापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन चक्रधर कांचन व त्याचा मित्र क्षितिज जाधव हे दोघेजण बुलेट गाडीवर आश्रम रोडने निघाले होते. तर सिद्धांत सातव व प्रतीक साठे हे दोघेजण इलेक्ट्रिक गाडीवर भवरापूरवरून उरुळी कांचन येथे काही कामानिमित्त निघाले होते. यावेळी आश्रम रोडवर जुन्या ठिकाणी असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते. यावेळी त्या ठिकाणी काही नागरिक रस्त्यावर फटाके वाजवत होते. त्यामुळे रस्ता पूर्णपणे हा धुरमय झाला होता. यावेळी अचानक पेटलेला फटाका दुचाकी चालकाला दिसला.
दरम्यान, पेटवलेला फटाका वाचवताना आश्रम रोडने आलेल्या दुचाकीने सोलापूर हायवे कडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि, दुचाकीवरील चौघेही उडून बाजूला पडले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील प्रतीक संतोष साठे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.